मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर मंत्री नवाब मलिकांनी आरोपाच्या मालिकाच सुरू केल्या आहेत. अनेक पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. मलिकांनी आज एक ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हॉटले 'ललित'मध्ये अनेक गुपितं दडले आहेत. त्यासाठी आपण रविवारी भेटुयात असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. पण, आता नवाब मलिक रविवारी आणखी कोणते खुलासे करणार? याकडे लक्ष लागले आहे.
त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती
फडणवीसांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्सचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर फडणवीसांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. पण, नवाब मलिकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ''तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो?'' असा सवाल फडणवीसांना केला होता. ''मागील पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होते. राज्याचे गृहखाते तुमच्याकडे होते. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती'', असंही मलिक म्हणाले होते.''फडणवीसांच्या काळात हॉटेलमध्ये सतत पार्टीचे आयोजन केले जात होते. रात्र-रात्र पार्टी चालायची. १५ कोटींची ही पार्टी होती. इतक्या महाग पार्टीचे आयोजक कोण होते? सरकार बदलले आणि पार्ट्या बंद झाल्या'', असंही मलिक म्हणाले होते. नवाब मलिकांनी दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते.
त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता मलिकांना हॉटेल ललितचं नाव घेत त्याठिकाणी अनेक गुपितं दडली असल्याचं म्हटलं आहे. मलिकांनी त्यादिवशी उल्लेख केलेले फुटेज सार्वजनिक करणार की आणखी नवे कोणते खुलासे करणार? हे आता रविवारीच समजणार आहे.