मुंबई | महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तसेच तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे एन. डी. पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या निधन झाले आहे. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात असून शरद पवारांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. एन. डी. पाटील यांनी उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले होते याची आठवणही शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितली आहे.
शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. तसेच सर्व कुटुंबियांप्रती या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करताना शरद पवारांनी एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.