"पवारांनी MPSC विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली", गोपीचंद पडळकरांचा आरोप

पवारांनी MPSC विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली, गोपीचंद पडळकरांचा आरोप

मुंबई। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नांसाठी आवाज उठवत होते. मुंबईतील आझाद मैदानात गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आता मात्र पडळकर यांनी आपला मोर्चा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यांकडे वळवला आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर आता गोपीचंद पडळकर यांनी टीकेचे बाण सोडले. प्रस्थापितांच्या राज्य सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. विधानसभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पडळकर नेमकं काय म्हणाले?

गेल्या वर्षभरापूर्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. कारण स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो

गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळेजण कोरोनाचा सामना करतोय, अशातच जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालेले असतांना कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पानं पुसली असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, अशी जहरी टीका आता गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top