अभिनेते किरण मानेंना गैरवर्तनामुळे मालिकेतून काढल्याचे वाहिनींने दिले स्पष्टीकरण

अभिनेते किरण मानेंना गैरवर्तनामुळे मालिकेतून काढल्याचे वाहिनींने दिले स्पष्टीकरण

मुंबई | सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतून निर्मात्यांनी तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. यावरुन सध्या सोशल मीडिया आणि राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर अनेकजण किरण मानेंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी किरण माने यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण येण्याची चिन्हं आहेत.

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढण्यात आलं. या प्रकरणी राज्यभर वाद निर्माण झाला असून अनेक राजकीय नेतेमंडळी आणि कलाकारीही त्यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. तर किरण माने यांनी काल (१५ जानेवारी) सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. कोणतंही कारण न देता केवळ राजकीय भूमिका घेतल्यामुळे मला मालिकेतून काढण्यात आले. हा एकप्रकारचा सांस्कृतिक दहशतवादच आहे. याविरोधात मी आवाज उठवायचा ठरवला, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर शरद पवार हे एकच नाव होते. शरद पवार हे तटस्थ राहून सगळं ऐकून घेतात. आजच्या घडीला राज्यात शरद पवार यांच्या इतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण असणारा नेता नाही, असे वक्तव्य अभिनेता किरण माने यांनी केले.

शरद पवार यांच्या भेटीनंतर किरण माने यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली का, असा प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा किरण माने यांनी म्हटले की, लगेच प्रतिक्रिया देणारे लोक उथळ असतात. तर शरद पवार हे सर्वकाही शांतपणे ऐकून घेतात. ते तुम्हाला खोचक प्रश्न विचारतात. मलाही त्यांनी दोन-तीन खोचक प्रश्न विचारले. त्यावरुन ते तुम्ही किती पाण्यात आहात, हे तपासतात. मी त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली आहे. मला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नाही. पण आता ते हे सर्व कशा पद्धतीने मांडतात, हे बघुयात, असे किरण माने यांनी सांगितले.मानेंना गैरवर्तनामुळे काढल्याचे स्टार प्रवाह वाहिनीकडून स्पष्टीकरण

दरम्यान, आता या प्रकरणी वाहिनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किरण माने यांना सोशल मीडियावरील राजकीय पोस्टमुळं नाही तर त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाबद्दल स्टार प्रवाह वाहिनीकडून अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि काल्पनिक आहे. हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे. निर्मिती संस्थेने माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळंच हा निर्मण घेण्यात आलाय. सह-कलाकारांसह, विशेषतः, शोच्या महिला अभिनेत्रीशी केलेल्या गैरवर्तनामुळं हा निर्णय घेतल्याचं प्रोडक्शन हाऊसनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर इतर काही कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या विरोधातत आक्षेपार्ह वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. अनेकदा समज देऊनही त्यांनी त्याच्या वागणुकीत बदल केला नाही त्यामुळं त्यांना मालिकेतून काढलं गेलं. या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो', असंही वाहिनीनं म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणात चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे. एखाद्याचं मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, अशी रोखठोक भूमिका समीर विद्वांस यांनी घेतली आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे", असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मानेंनी विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही - अतुल लोंढे

या प्रकरणी काँग्रेसने किरण माने प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही - प्रवीण दरेकर

तर यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे. एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. 'स्टार प्रवाह'चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा 'स्टार प्रवाह' स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी 'स्टार प्रवाह'चा अधिकार आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

मानेंनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला - अमेय खोपकर

तर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भूमिका घेऊ असं म्हटलं आहे, असं एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे. अमेय खोपकर म्हणाले, "किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल" असंही अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.Next Story
Share it
Top
To Top