नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून शरद पवारांवर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. तर आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. 'नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही', असे म्हणत 'राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे', अशा शब्दांत फडणविसांनी टोला लगावला आहे.


शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी आणि काँग्रेसला सोबत घेऊन गोव्यात सत्ताधारी भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. तर देवेंद्र फडणविसांनीही पवारांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, "नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!", अशी टीका फडणविसांनी केली आहे.


राष्ट्रवादी पक्ष 'राष्ट्रीय पार्टी' नाही


फडणवीस म्हणाले, "शरद पवारांचा पक्ष असा आहे की, 'पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा', मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, तर कधी काँग्रेसशी आणि कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही", असं ते म्हणाले.


लढत नक्की कोणासोबत?

दरम्यान, यावेळी फडणविसांनी निश्चतच भाजप गोव्यात पुन्हा सरकार बनवणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. पण आता गोव्यात सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की, लढत नक्की कोणासोबत आहे हे निश्चित होणं बाकी आहे. विरोधी पक्ष आपआपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे, हे निश्चित झालं की त्यावर बोलता येईल, असे फडणविसांनी सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top