जाधव नाचे, वाघाची मांजर कधी झाली अन् कोण अजित पवार; नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून घेतला खरपूस समाचार

जाधव नाचे, वाघाची मांजर कधी झाली अन् कोण अजित पवार; नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून घेतला खरपूस समाचार

कणकवली | भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर सुरू असलेल्या अटक कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. सुनील प्रभू यांची औकात काढत भास्कर जाधव नाचे आहेत, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध आहे, असा उलट सवालही राणे आज (२८ डिसेंबर) पत्रकार परिषदेतून केला आहे.

नारायण राणेंनी कणकवलीत पत्रकारांशी संवाद साधताना आघाडी सरकारमधील नेत्यांवर चौफेर टीका केली आहे. या पत्रकार परिषदेत राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनाही फटकारले आहे. पंतप्रधानांवर टीका सहन करुन घेणार नाही. कोकणातील काही भागात नाचे असतात, ते होळीच्या वेळी पैसे देऊन नाचतात. त्या दिवशी तोच प्रकार विधानसभेत झाला. आम्ही नाचे म्हटले तर तुम्ही म्हणाल मलाच म्हटले, अशी टीका त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे. तसेच भाजपमध्येही नकलाकार आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांना त्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले जाईल, असे राणेंनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध ?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणेंनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजरीचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. नितेश यांच्या या कृतीवर सर्वत्र टीका होत असताना नारायण राणेंनी मात्र आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? वाघाची मांजर कधी झाली, असा सवाल केला आहे. तसेच एवढा पोलीस फाटा कणकवलीत येण्यामागे काय घडलं? असंही नारायण राणे म्हणाले.

कोण अजित पवार? मी ओळखत नाही

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये केलेल्या वक्तव्यावर विचारण्यात आले असता कोण अजित पवार? मी त्यांना ओळखतही नाही, असे म्हणत नारायण राणेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ज्याच्यावर बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा अशांचा संदर्भ देऊ नका असे राणे यांनी म्हटले. तसेच कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा अजित पवार कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.

सुनील प्रभूंची औकात काय?

राणे नेहमी समोर येऊन बोलतात, असे राणे म्हणतात. मग आता नितेश राणे कुठे दिसत नाहीत, असा टोला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लगावला होता. यावरून राणेंनी थेट सुनील प्रभूंची औकात काढली. कोण सुनील प्रभू? त्यांची औकात काय? समोर या आणि बोला. आम्ही समोरच बोलतो. अनिल देशमुख एवढे दिवस कुठे होते? तो राठोड की फाटोड तोही अदृश्य होता? तुम्हाला इतिहास माहीत नाही. तुम्ही पीए होता. पीएचं काम लिहायचं असतं. बोलायचं नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.


Next Story
Share it
Top
To Top