मुंबई | समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमकणूक केली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी जारी केलेत. त्यामुळे आता या आदेशानुसार मुंबई पोलीस स्वतंत्र्यपणे या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करणार आहेत. आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बुधवारी चार तास चौकशी करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनीही या लाचखोरी प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे.
सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार हा तपासाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलिप सावंत करतील. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे. या चारपैकी प्रभाकर साईलने केलेली तक्रार ही आर्यन खान प्रकरणातील आहे. प्रभाकर साईल हा या छाप्यातील साक्षीदार आहे. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईलने केलाय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईलने म्हटलंय.
काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली, असं साईलने सांगितलं. बुधवारी दक्षता पथकाने चार तास समीर यांची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. वानखेडे यांच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’चे दक्षता पथक दिल्लीहून मुंबईत आले आहे. पथकाने वानखेडे यांची चौकशी केली. त्यापूर्वी ‘एनसीबी’च्या मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे व चित्रफिती या पथकाने ताब्यात घेतल्या. या प्रकरणी एनसीबी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह के. पी गोसावी, प्रभाकर साईल यांचाही जबाब नोंदविणार असल्याचे समजते.