धनंजय दळवी | मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्रीं’चे आगमन होत आहे. शनिवारी खेतवाडी १२वी गल्लीतील खेतवाडीचा गणराज आगमन सोहळा आज भारतमाता सिनेमा येथून सुरू झाला. तसेच मुंबईतील घोडपदेवचा राजा, खंबाटा लेन खेतवाडी, विलेपार्लेचा पेशवा, डोंबिवलीचा लाडका, खरवाचा राजा, चेंबुरचा विघ्नहर्ता गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपात ढोलताशांच्या गजरात आगमन झाले.
शनिवार, रविवारचा वेळ साधत गणेश मंडळांनी दुपारनंतर ठिकठिकाणी गणेशाचे आगमन सोहळ्यास सुरुवात केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तींच्या कारखान्यात एकत्र येत ढोलताशांचा गजर सुरू केला, शिवाय बाप्पाचा जयघोष करत गणेशमूर्ती वाहनावर विराजमान केली. ढोलताशांच्या गजरात रात्री उशिरा गणेशमूर्ती मंडपांत दाखल होतील.
दरम्यान, खेतवाडीच्या गणराजासह इतर सर्व ठिकाणांच्या आगमन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इतर ठिकाणीही हाच आनंद पाहण्यास मिळाला. दरम्यान, आता उद्या रविवारीही मोठ्या गणेशमूर्तींचे आगमन होणार असून, यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत, तर दुसरीकडे दहीहंडीचाही उत्साह शहरात पसरला आहे.