आगमन बाप्पाचे | 'श्री'रंगी रंगल्या बाजारपेठा

आगमन बाप्पाचे | श्रीरंगी रंगल्या बाजारपेठा

धनंजय दळवी | गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस राहिले असताना गणपतीच्या तयारीसाठी मुंबईकरांनी शहरातील विविध मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात कार्यकर्ते सजावटीच्या कामात मग्न आहेत. तर घरगुती सजावट आणि 'श्रीं'च्या मूर्तीच्या सजावटीच्या सामग्रीसाठी रेलचेल सुरू आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यासाठी गणेशभक्त कामाला लागले आहेत.

दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, अंधेरी, बोरीवली, कुर्ला, भांडुप परिसरातील मार्केटमध्ये भाविकांनी एकच गर्दी केली. लाडक्या बाप्पाची आरास सजवण्यासाठी इकोफ्रेंडली मखर, शंख, स्वस्तिक, घंटा, उंदीर, कंठी अशा वस्तूंची खरेदी सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी पडदे, दिव्यांची आरास करण्यासाठी दिव्यांच्या माळांची खरेदी केली जात आहे.

इलेक्ट्रिकवर चालणारी दीपमाळ, निरांजन, समई, पणत्यांनी अनेक भक्तांना आकर्षित केले. उदबत्त्या, धूप, कापूर, गुलाल, बुक्का अशा पूजेच्या सामानाच्या वस्तू खरेदी यादीत होत्या. वस्तूंची खरेदी करीत असतानाच बाप्पासाठी लागणाऱ्या सामग्रीचे बुकिंग देखील केले जात होते. लहानसहान गोष्टी विसरायला नको म्हणून यादीनुसार खरेदी सुरू होती. दुसरीकडे शहरातील विविध गणपती मंडळांच्या मंडपात कार्यकर्त्यांची सजावटीसाठी लगबग सुरू आहे. तर काही मंडपांत गणपती बाप्पा आधीच विराजमान झाले आहेत. त्या मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.


Next Story
Share it
Top
To Top