धनंजय दळवी| अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणपतीसाठी दादरमधील विविध ठिकाणी सजावट साहित्याने दुकाने सजली असून यंदा त्यावरही "चायना मेड' वस्तूंचा दबदबा दिसून येत आहे. मंदिरापासून ते मोत्याच्या माळा, इलेक्ट्रीक वस्तूंपर्यंत सारे काही "चायना मेड' असल्याचे पहायला मिळत आहे.
आकर्षक दिसणाऱ्या आणि स्वस्त असल्याने या वस्तूंकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व अन्य इलेक्ट्रिक आकर्षक साहित्य बाजारात झळकत आहेत. चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी माल टिकाऊ आणि चांगला आहे. मात्र चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा दर जास्त असल्याने ग्राहक चायना मालच जास्त खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
प्लॅस्टिक बंदीमुळे साहित्य महागले
महाराष्ट्र सरकारने पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा निर्णय यावर्षी घेतल्याने प्लास्टिक, थर्माकॉल वापरावर मर्यादा आल्या आहेत. प्लॅस्टिक बंदीमुळे यावर्षी विक्रीसाठी लाकडी मखर आणि इतर साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने ग्राहकांचा म्हणावा तसा यावर्षी प्रतिसाद मिळत नाही. या सणादरम्यान प्लॅस्टिक बंदी शिथिल करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
गौरी व गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सजावट साहित्यात थर्माकॉलचा वापर थांबल्यामुळे बाजारात लाकडी सजावट साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने गौरी, गणेश भक्तांना यावर्षी जादा पैसे मोजावे लागत आहेत. प्लॅस्टीक आणि थर्माकॉल बंदी असली तरी काही साहित्य थोड्याफार प्रमाणात आजही दिसत आहे.