HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांची भाषा पदाला शोभणारी नाही, त्यांनी राजकारणाची पातळी सोडू नये! 

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, केंद्र सरकारने कोणतीही तयारी न करता देशभर लॉकडाऊन ची घोषणा केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारी बांधवांची स्थिती बिकट झाली, हातावर पोट असलेल्या सदर मजुरांना उपाशी मरण्याची वेळ आली. अशा वेळी काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधीजी यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेवरून आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत सदर मजुरांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. अनेक मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. जेव्हा हे मजूर बांधव घराच्या ओढीने आपल्या राज्यात परत जाऊ इच्छित होते, तेव्हा देशभर रेल्वे बंद होत्या. मजूर पायपीट करत उत्तर प्रदेश आणि बिहार कडे निघाले होते. त्यात अनेकांचा मृत्यू झाला हे देशाने पाहिले. ही व्यथा बघून आदरणीय सोनिया जी आदरणीय राहुल जी यांनी आम्हाला आवश्यक त्या सूचना केल्या आणि सदर मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही आमच्या उत्तर भारतीय बांधवाच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. व त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुमारे 50 हजार मजुरांना स्वखर्चाने सुखरूप आपापल्या गावी पोहोचविले, नंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने देखील दोनशे कोटी रुपयांची तरतूद करत सदर मजुरांची स्वतःच्या राज्यात जाण्याची सन्मानजनक व्यवस्था केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या या संपूर्ण कामाची जगभर वाहवा झाली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेलेल्या मजुरांनी देखील महाराष्ट्र सरकारचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्याच उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या बांधवांवर आरोप करून मोदीजी काय सिद्ध करू इच्छित आहेत? काँग्रेसवर आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे.

थोरात पुढे म्हणाले, खरेतर या काळात मजुरांच्या जाण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करणे अपेक्षित होते, मात्र केंद्र सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले आणि सदर मजुरांना मरण्यासाठी सोडून दिले. काँग्रेस पक्ष मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढे आला. अनेक कार्यकर्त्यांनी पदरमोड करत सदर मजुरांना सन्मानजनक रित्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठविले. आम्हाला वाटत नाही, हा गुन्हा आहे. भारतातल्या सामान्य माणसांच्या पाठीशी काँग्रेस कायम उभी राहिली आहे आणि यापुढे उभी राहील, असे महसूल मंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत! – के. चंद्रशेखर राव

Aprna

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक, १ अधिकारी आणि २ जवान शहीद

News Desk