नवी दिल्ली | देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आजच उत्तर प्रदेश विधानसभमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर झाली. तर आता उत्तर प्रदेश पाठोपाठ पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज (१५ जानेवारी) जाहीर झाली आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येण्यासाठी कंबर कसली आहे. पंजाब काँग्रेसने ८६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यात पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना चमकौर साहिबमधून, नवज्योत सिंह सिद्धू यांना पूर्व अमृतसर आणि अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद यांना मोगा या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. दरम्यान, प्रताप सिंह बाजवा यांना कादियानमधून, गायक सिद्धू मूसेवाला यांना मानसा, सुजानपूरमधून नरेश पुरी, पठानकोट येथून अमित विज आणि गुरदासपूरमधून बरिंदरजीत सिंह पहरा या सर्व काँग्रेसकडून तिकीट दिले आहे.
पंजाब विधानसभेचा कार्यकाळ हा २७ मार्च २०२२ रोजी संपणार असून पंजाब विधानसभा निवडणूक ११७ जागांवर निवडणुका होणार आहे. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीमध्ये एकाच टप्यात मतदान होणार असून १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवार २८ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर २९ जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होणार असून ३१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.