नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी योगी आदित्यनाथ हो गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. यानंतर योगींना विधानपरिषदेद्वारे उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले होते.
योगी हे हिंदुत्वाचा मोठा चेहरा मानले जात आहेत. तसेही अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू असून काशीमध्ये विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधण्यात आले आहे. यामुळे योगींनी मथुरा किंवा अयोध्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चा आधीही रंगल्या आहेत. आता पक्ष योगींना नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचा कॅडर बेस आहे. तर योगींचे गुरु महंत अवैद्यनात आणि त्यांचे गुरु महंत दिग्विजयनाथ या दोघांचा अयोध्या आणि राम मंदिर उभारणीच्या चळवळीचा थेट संबंध राहिला आहे.
विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भजापला कमळ फुलवण्यासाठी पक्ष जोरदार कामाला लागला आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत हिंदुत्त्व आणि राम मंदिरचा मुद्दा गाजणार असल्याचे सर्वांच देशातील जनतेला माहिती आहे. यापूर्वी योगींनी मथुरा विधानसभेतून निवडणूक लढवावी, अशी चर्चा रंगली होती. कारण भाजपचे खासदार हरनाथ यादव यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून तशी मागणी केल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली होती. यावेळी यादव म्हणाले, "भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली, " असे पत्रात त्यांनी सांगितले होते.