मुंबई | अकॅडमी ऑफ चेस ट्रेंनिग, साऊथ मुंबई चेस अकॅडमी व इंडियन चेस स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया चेस फेडरेशन व ऑल मराठी चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने महावीर प्रसाद मोरारका स्मृती चषक महाराष्ट्र राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा १४ ते १८ नोव्हेंबर रोजी वरळी येथील नेहरू सेंटर हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ६ वर्षाखालील, ८ वर्षाखालील, १० वर्षाखालील, १२ वर्षाखालील, १४ वर्षाखालील, आणि १६ वर्षाखालील मुले व मुली अशा एकूण १२ गटात होणार आहे.
राज्यातील तब्बल १,००० पेक्षा अधिक १६ वर्षांखालील शालेय मुले-मुली स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामध्ये हार्मोनी मॉन्टेसरीचा ३ वर्षीय आयांश शाह व सर्वात लहान फिड़े गुणांकित खेळाडू पुण्याच्या विबग्योर स्कूलचा निवान खंडादिया यांचा खेळ प्रेक्षणीय असेल. बुद्धिबळप्रेमी स्व. प्रसाद यांच्या जन्मशताब्दीनिमित होणाऱ्या स्व.महावीर मोरारका राज्य स्तरीय शालेय प्रतिष्ठेच्या बुध्दिबळ स्पर्धेमधील एकूण १२२ विजेत्या उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार माजी खासदार कमल मोरारका यांच्या तर्फे दिले जाणार आहेत. प्रत्येक गटातील पुढील १० उपविजेत्यांना पदक स्वरुपात पुरस्कार आहेत. ६ वर्षांखालील वयोगट वगळता अन्य वयोगटासाठी फिड़े रेटिंग मिळू शकेल.
अशाच प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा येत्या काळात आम्ही आयोजित करणार असून ३० डिसेंबरपासून आयआयएफडब्लूएल ऍडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा ही माजी खासदार कमल मोरारका यांच्या सहकार्याने होणार आहे. त्यावेळी पाच वेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती साउथ मुंबई चेस अकॅडमीचे सीईओ दुर्गा नागेश गुतुला यांनी दिली.