नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात अनेकदा विरोधकांना शब्दांच्या खेळीने आऊट केले आहे. परंतु खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी काल(३ डिसेंबर) क्रिकेट खेळताना पहायला मिळाले. नागपूर हे त्यांचे होम ग्राऊंडवरील क्रिकेटच्या पिचवर त्यांनी मनसोक्त फटकेबाजी करत बॅटिंगचे कौशल्य दाखवले. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील क्रिकेटच्या पिचवर फलंदाजी केली. यावेळी फलंदाजी करताना मुख्यमंत्र्यानी काही चेंडू सहज टोलवले. विशेष म्हणजे फडणवीस यांनी अचानक एक रिव्हर्स स्वीप लगावला. मुख्यमंत्र्यांचा रिव्हर्स स्वीप पाहून टाळ्या वाजवून उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. काही कार्यकर्त्यांच्या चकवणाऱ्या चेंडूवर मुख्यमंत्रीही बीट झाले. तर अखेरच्या चेंडूवर पायचीत झाले. व्यस्त राजकीय कार्यक्रमात अनेक वेळा राजकीय मंडळींना क्रिकेट किंवा कोणत्याही क्रीडा प्रकारांसाठी वेळ मिळत नाही. खेळण्याची ही इच्छा फडणवीस यांनी आज पूर्ण केली.