नवी दिल्ली | क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानयांच्यातील सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील लढतीमध्ये भारतआणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ११ नोव्हेंबरला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला होता. या सामन्यात भारताने ३४ धावांची विजय मिळवला होता.
भारताच्या हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर १०३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत पुन्हा एकदा मोठी खेळी साकारणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्याचबरोबर भारताची जेमिमा रॉड्रीग्स ही युवा खेळाडूही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.