HW News Marathi
राजकारण

पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे !

मुंबई | भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार म्हणून पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना पकडले, पण तेलतुंबड्यांना पकडल्याबद्दल पुणे जिल्हा न्यायालयाने पोलिसांनाच गुन्हेगार ठरवले. कोणत्या आधारावर तेलतुंबडे यांना अटक केली, पुरावा काय, असे प्रश्न विचारून कोर्टाने तेलतुंबड्यांना सोडून दिले. त्यापाठोपाठ तेलतुंबडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आता न्यायालयाने त्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. प्रा. तेलतुंबडे यांच्यासाठी छाती पिटणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. देशविरोधी भयंकर काही तरी शिजते आहे. पोलिसांनाच आरोपी करणे ही त्या कटाची सुरुवात आहे. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून पोलिसांची पाठ राखण केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

अल-कायदा व या ‘एल्गार’ छाप विचारवंतांची कार्यशैली एकच आहे. पोलीस, प्रशासन व कायद्यावर सतत हल्ले करायचे, सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, व्यवस्थेचे मनोधैर्य खच्ची करून पांगळे बनवायचे ही अल-कायदाची रणनीती आहे. एल्गारवाल्यांचीसुद्धा तीच नीती आहे. सामुदायिक हत्याकांड, भ्रष्टाचार, हत्या अशा आरोपांतूनही गुन्हेगार सुटतात, मात्र म्हणून ते निर्दोष असतातच असे नाही. प्रा. तेलतुंबडे यांच्यासाठी छाती पिटणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. देशविरोधी भयंकर काही तरी शिजते आहे. पोलिसांनाच आरोपी करणे ही त्या कटाची सुरुवात आहे. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे.

भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार म्हणून पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना पकडले, पण तेलतुंबड्यांना पकडल्याबद्दल पुणे जिल्हा न्यायालयाने पोलिसांनाच गुन्हेगार ठरवले. कोणत्या आधारावर तेलतुंबडे यांना अटक केली, पुरावा काय, असे प्रश्न विचारून कोर्टाने तेलतुंबड्यांना सोडून दिले. त्यापाठोपाठ तेलतुंबडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आता न्यायालयाने त्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे तेलतुंबडेंना आणखी सहा-सात दिवसांचा ‘दिलासा’ मिळाला आहे. तेलतुंबडे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वगैरे विचारवंत असल्याचे ढोल आता वाजवले जात आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांनी त्यांचा उल्लेख ‘दलित ऍकॅडमिक’ असा केला आहे. खरे म्हणजे विचारवंत, बुद्धिवंताना जात, धर्म, पंथाची उपाधी लावू नये. पोटाला व शहाणपणास जात चिकटवणे हा मेंदू नामक अवयवाचा अपमान ठरतो. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात जातीय विष पेरले गेले. त्यानंतर भीमा-कोरेगावची दंगल उसळली. महाराष्ट्रात असा विखारी जातीय उद्रेक कधीच झाला नव्हता. यात सामान्य जनतेची होरपळ झाली. डॉ. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे आगीत तेल ओतून प्रकरणाचा भडका का वाढवीत होते व त्यांना नेमके काय करायचे होते ते अनाकलनीय असले तरी महाराष्ट्र पेटवण्याचा कट नक्षलवादी ऐक्यातून शिजला व त्यामागे स्वतःस कवी, लेखक, बुद्धिमान म्हणवून घेणाऱ्यांची विचारी डोकी होती. एल्गार परिषदेची पडद्यामागून सूत्रे हलविण्याच्या आरोपावरून तेलतुंबडे यांच्यासह तेलुगू लेखक वरवरा राव, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, वर्नोन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांना जानेवारी महिन्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या कारवाईनंतरही देशातील

भंपक बुद्धिवाद्यांनी

जणू आभाळ कोसळले असा गदारोळ केला होता आणि देश बुडालाच असा माहोल निर्माण केला होता. न्यायालयाने या सर्व मंडळींना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले होते. आता तेलतुंबडे यांच्याबाबतीतही तेच घडले आहे. म्हणजे पोलिसांनी काहीच न करता ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून शांत राहायचे का? या बुद्धिवाद्यांनी केलेला विखारी प्रचार, त्यांचे संभाषण याबाबत पोलिसांनी पुरावे सादर केले. हे सर्व लोक देश अस्थिर करण्यामागचे सूत्रधार होते. पुन्हा शिकलेसवरलेले असल्याने आणि मोठ्या लोकांत ऊठबस असल्यामुळे त्यांना प्रतिष्ठेचे एक वलय मिळाले होते. प्रशासन, न्याय व्यवस्था, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लागेबांधे निर्माण करून स्वतःभोवती कवचकुंडले निर्माण केली व त्याचा फायदा घेऊन ही मंडळी देशात नक्षलवाद, माओवादाचा विध्वंसक विचार पेरीत आहेत. त्या अर्थाने ही मंडळी दहशतवादाचे प्रायोजक किंवा प्रचारक म्हटले पाहिजेत व आनंद तेलतुंबडे यांच्यावर हाच ठपका आहे. इतर काही तथाकथित विचारवंतांविरोधातही हाच आरोप आहे. विचारवंत असला तरी तुम्हीही कायद्याला सामोरे जायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे दहशतवादी असे प्रकाश आंबेडकर व त्यांचे साथी सांगतात. त्यांचा साथी म्हणजे हैदराबादचा ओवेसी आहे आणि हेच लोक कन्हैयाकुमार, तेलतुंबडे, जिग्नेश मेवानीचे समर्थन करतात. संघ हा प्रखर राष्ट्रवादी आहे. चीन, रशिया, पाकिस्तानात त्यांनी शहाणपण गहाण टाकलेले नाही व आंतरराष्ट्रीय ‘स्कॉलर्स’ची पदवी लावून ते फालतू एल्गार करीत नाहीत हा फरक समजून घेतला पाहिजे. हिंदुत्वाचा द्वेष हाच या मंडळींचा विचार आहे आणि हेच विचारवंत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन

देशाची बदनामी

करीत आहेत. प्रा. तेलतुंबडे हे ‘स्कॉलर’ आहेत. बॅ. विनायक दामोदर सावरकर हेदेखील स्कॉलर होते व त्यांनी ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान रचले. त्याबद्दल वीर सावरकरांना आजही दहशतवादी वगैरे ठरवून अवमानित केले जाते. सावरकरसारख्यांनी परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचला होता, पण ‘एल्गार’वाल्यांना स्वतंत्र हिंदुस्थानात उद्रेक घडवायचा होता हे लक्षात घेतले पाहिजे. प्रकाश आंबेडकर एकीकडे शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी कारवाई करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करण्याच्या प. बंगाल पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करतात आणि इकडे महाराष्ट्र पोलिसांनी भीमा-कोरेगावप्रकरणी केलेल्या कारवाईबाबत वेगळी भूमिका घेतात. महाराष्ट्रात भीमा-कोरेगावप्रकरणी जो उद्रेक घडवला गेला त्यातून समाज दुभंगला आहे व अशा दुहीची बीजे पेरणाऱ्या कविता, साहित्य निर्माण करणे, प्रसारित करणे, या उद्रेकासाठी निधी संकलित करणे हे या माओवादी विचारवंतांचे कार्य बनले आहे. अल-कायदा व या ‘एल्गार’ छाप विचारवंतांची कार्यशैली एकच आहे. पोलीस, प्रशासन व कायद्यावर सतत हल्ले करायचे, सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, व्यवस्थेचे मनोधैर्य खच्ची करून पांगळे बनवायचे ही अल-कायदाची रणनीती आहे. एल्गारवाल्यांचीसुद्धा तीच नीती आहे. सामुदायिक हत्याकांड, भ्रष्टाचार, हत्या अशा आरोपांतूनही गुन्हेगार सुटतात, मात्र म्हणून ते निर्दोष असतातच असे नाही. प्रा. तेलतुंबडे यांच्यासाठी छाती पिटणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. देशविरोधी भयंकर काही तरी शिजते आहे. पोलिसांनाच आरोपी करणे ही त्या कटाची सुरुवात आहे. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत !

News Desk

#KnowYourNeta | जाणून घ्या…यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबत

News Desk

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit